सण व उत्सव माहीती







जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
आरंभीचा प्रथमावस्थेतील बौध्द धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भीस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुध्द हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधीवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दु:ख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.
दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.
ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.
सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौध्दांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यु कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचता, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामुहिक प्रार्थना करण्याची पद्धत आहे.


रक्षाबंधनाची सुरवात केव्हा झाली, याबद्दल निश्‍चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजावृत्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रजपूत लोकांत रूढ झाला. आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीने आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधावीच; पण तसा भाऊ नेसल तर नात्यांनी असलेल्या भावाला राखी बांधावी. राखी बांधताना बहिणीने म्हणावे- येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.)
राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन घेणे. रक्षाबंधन म्हणजे केवळ आपल्याच बहिणीच्या नव्हे, तर समाजातील सर्व स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी असते . रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला,
ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे. रजपूत लोक शूर, कडवे म्हणून विशेष प्रसिद्ध. कडवे म्हणजे शब्दास जागणारे आहेत. फार पूर्वी राजपूत काळात त्यांची साम्राज्ये होती. त्या वेळेपासून हा सण साजरा केला जात आहे. स्त्रिया आपला पती, भाऊ यांच्या मनगटास राखी बांधतात. राखी म्हणजे दोऱ्याचे बंधन. ही राखी स्त्रिया कलाकुसरीने आकर्षक बनवतात. दोऱ्याचे बंधन घालून स्त्रिया आपली, आपल्या अब्रूचे रक्षण करण्याची जबाबदारी
बंधन तुमच्यावर आहे, असे त्या पुरुषास- भावास सांगतात. त्यामुळे त्या काळात आपल्याला ज्या स्त्रीने राखी बांधली, तिच्या रक्षणार्थप्रसंगी प्राण द्यायचे ही राजपुतांची नीती होती. याची बरीच उदाहरणे आहेत. एवढेच नव्हे, तर चितोडवर जेव्हा बहादूरशहाने हल्ला केला, त्या वेळी राणी कर्णावतीने बाबरचा पुत्र हुमायूनला राखी भेट पाठवून आपले व आपल्या राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. हुमायूनने देखील जाती-धर्म याचा विचार न करता चितोडचे रक्षण केले. राखी पोर्णिमेसच "श्रावणी " असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय. श्रावण नक्षत्रावर श्रावणी करतात. "राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे. पूर्वीपासून सासुरवाशीण मुली सणावारांसाठी माहेरी येत. त्या वेळी माहेरचे बालपण, लाड-प्रेम व सासरचा संसार यांची मनात घालमेल होई, ती आजही होतेच आहे. या मनाच्या खेळात आपला शाश्‍वत पाठीराखा कोणी असावाच, ही भावना मग भावाजवळ येऊन थांबते, ती कृष्णाचे रूप त्याच्यात बघतच. कोणत्याही क्षणी, प्रसंगी कुठेही हाक मारताच धावून येणारा भाऊ हे बहिणीचे मर्मस्थान असते. अशा भावाला रेशीमधाग्याची राखी बांधताना तिच्या मनात भीतीचा लवलेश राहत नाही. एक राखी जीवनभर रक्षणाची साथ देते. याला इतिहास साक्ष देतो जात-धर्म-पंथाला छेद देत हे आपल्याला ज्ञात आहेच. हे संदर्भ लक्षात घेऊन "राखी' बांधली तर तो आजन्म कृष्णासारखा होतो. म्हणूनच दुर्बलांचे रक्षण हाच संदर्भ, संस्कार महत्त्वाचा, हेच या दिवसाचे माहात्म्य आहे.

1 टिप्पणी: